Pages

Thursday, March 29, 2012

पुरंदर

पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर नावाचा तालुका आहे. तालुक्याचे गाव सासवड आहे. पुरंदर हे तालुक्याचे नाव पुरंदर या किल्ल्यामुळेच रुढ झालेले आहे. सासवड पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुरंदर किल्ला १५ किलोमीटर आहे. पुणे-पंढरपूर या मार्गावर सासवड आहे.


पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून तीन मार्ग आहेत. पुणे, हडपसर, दिवेघाट मार्गे सासवड वरून पुरंदर तसेच पुणे कोंढवा, बोपदेव घाट मार्गे सासवड वरून पुरंदर किंवा पुणे सातारा या महामार्गावरील कापूरहोळ येथून सासवडकडे जाणार्‍या मार्गावर पुरंदर किल्ल्याकडे जाणारा फाटा आहे. सासवड- कापूरहोळ मार्गावर नारायणपूर आहे. नारायणपूर हे धार्मिक क्षेत्र म्हणून सध्या प्रसिध्द पावलेले आहे. येथून एक किलोमीटर अंतरावर पेठ गाव आहे. गडावर स्वातंत्र्यानंतर सैनिकी प्रशिक्षण शिबिर होते. त्यामुळे पेठ येथून जीपसारखी वाहने पुरंदरच्या माचीवर जावू शकतील असा गाडी रस्ता आहे.


सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्व-पश्चिम असा भुलेश्वर रांगेचा फाटा आहे. या भुलेश्वर रांगेच्या फाट्यालाच बोपदेव घाटाजवळ एक उपरांग फुटते. या उपरांगेवर पुरंदर आणि वज्रगड या किल्ल्यांची जोडी आहे.




पेठ गावातून आपण गडचढाईला सुरूवात करतो. पेठ गावापर्यंत पुरंदर किल्ल्याच्या माचीतून एक डोंगर धार उतरलेली आहे. या धारेवरुन चढाई करुन आपण पुरंदर किल्ल्याच्या माचीमध्ये पोहोचतो. या तीव्र धारेवरुन चढाई करताना आपल्या डावीकडे असलेला वज्रगड किल्ला आपली सोबत करीत असतो. माचीमध्ये आपण बिनी दरवाजाने प्रवेश केल्यावर आपल्याला पेठमधून आलेला गाडी मार्ग लागतो. या दरवाजाच्या जवळच पश्चिमेकडे वीर मुरारबाजी यांचा आवेशपूर्ण भव्य पुतळा आहे.

या नरवीर मुरारबाजी यांच्या पुतळ्यासमोर आपण उभे राहतो, तेव्हा पुरंदरच्या इतिहासाची अनेक पाने आपल्यासमोर उलघडू लागतात. पुरंदर किल्ल्याचा इतिहास यादवकालाच्याही अगोदरचा आहे. यादवकालाच्या अगोदर पासून पुरंदर किल्ला अस्तित्वात असल्याचे दिसून येते. यादव कालात काही काळ यादवांचा ध्वजही पुरंदरवर दिमाखात फडकत होता. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमनानंतर यादवांची सत्ता नामशेष होत असतानाच बहमनी राजवटीची सत्ता स्थापन झाली. पुरंदर किल्ला बहमनी राजवटीत सामील करण्यात आला. बहमनी राज्याची शकले झाली. त्यातून निर्माण झालेल्या पाच शाह्यांपैकी अहमदनगरच्या निजामशाहीने पुरंदर किल्ला आपल्या अखत्यारीत आणला. पुढे निजामशाही इतर शाह्यांनी संपुष्टात आणली. तेव्हा पुरंदर आदिलशहाच्या ताब्यात आला.


शहाजीराजे आदीलशाहीमध्ये दाखल झाले. त्यावेळी पुरंदर किल्ल्यावर हवालदार होते महादजी निळकंठ. या महादजी निळकंठांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पुरंदर किल्ल्याच्या स्वामित्वासाठी महादजी निळकंठांच्या चार मुलांमध्ये वाद सुरु झाला. त्यांच्यामधील भांडणे विकोपाला गेली होती. ही बाब शिवाजीराजांच्या लक्षात आली. या भावांच्या भांडणात आदिलशाहीचा हस्तक्षेप झाला तर ते या चौघांना हाकलून एखादा नवाच हवालदार गडावर नेमतील. महाराजांनी त्यांना समजावले आणि चौघांनाही पुरंदरवरून दूर सारले. त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतले आणि रक्ताचा थेंबही न सांडता पुरंदर स्वराज्यात दाखल करुन घेतला. पुढे स्वराज्यावर चालून येणार्‍या फत्तेखानाला या पुरंदरच्याच सानिध्यात पराभूत करुन महाराजांनी त्याला पळवून लावले.


छत्रपती संभाजी महारांजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरच झाला. तेव्हा नेताजी पालकर किल्लेदार होता. पुढे मुरारबाजी किल्लेदार असताना मोगल सरदार मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांनी स्वराज्यावर घाला घातला. पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी दिलेरखानाने प्रयत्नांची शिकस्त केली पण पुरंदर आणि दिलेरखान यांच्यामध्ये वीर मुरारबाजी उभा ठाकला होता. दिलेरखानाने हरप्रयत्न करुन वज्रगड हा पुरंदरचा जुळा किल्ला ताब्यात आणला. त्यावर तोफा चढवून दिलेरखानाने पुरंदरवर हल्ला चढवला. पुरंदरच्या माचीवरील तटबंदी फोडून दिलेरखानाचे सैन्य पुरंदरमध्ये घुसले.


मुरारबाजी आणि मावळ यांनी पुरंदरच्या बालेकिल्ल्याचा आसरा घेतला. मोगलांचे सैन्य पुरंदरच्या माचीत घुसलेले पाहून मुरारबाजी आणि निवडक मावळ्यांनी बालेकिल्ल्यातून बाहेर येऊन मोगली सैन्यावर प्रखर हल्ला केला. मोगल सैन्य या हल्ल्यामुळे हतबल झाले. मुरारबाजीच्या पराक्रमाने दिलेरखानही चकीत झाला. या लढाईत मुरारबाजी यांनी भीमपराक्रम गाजवून स्वामीकार्यावर आपले बलिदान दिले. पुढे तहात हा किल्ला मोगलांना मिळाला. पुढे सवाई माधवराव पेशवे यांचा जन्मही पुरंदरवर झाला. वीर मुरारबाजींच्या पराक्रमाच्या स्मृती मनात घोळवीतच आपण गडदर्शनाला सुरुवात करतो.


पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या खालील भागात काहीसा सपाटीचा भाग आहे. याला पुरंदरचा माची म्हणतात. ही माची तटबंदीयुक्त आहे. माचीच्या पश्चिमेकडून गाडीमार्ग येतो. या भागात पद्मावती तळे असून सैन्यासाठी स्वातंत्र्योत्तर बराकी व इतर इमारतीचे बांधकाम आहे. माचीच्या मध्यावर वीर मुरारबाजी यांचा पुतळा आहे. जवळच बिनी दरवाजा असून समोरच इंग्रजकालीन चर्चचे अवशेष आहेत. माचीवरुन पूर्वेकडे निघाल्यावर उजवीकडे पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. पुरंदरेश्वर ही गडदेवता आहे. याच्या दारात पाण्याचे टाके आहे. बाजूला एक चहापानाची सोय असलेली एक टपरीही आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. या माचीवर सैनिकांच्या सोयीसाठी केलेल्या बांधकामामध्ये शिवकालीन बांधकामे पूर्णपणे नामशेष झालेली आहेत. पुरंदरेश्वराजवळूनच बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. बालेकिल्ल्यावर जाण्याअगोदर बाजूचा वज्रगड प्रथम पहाणे सोयीचे होईल. आपण वज्रगड-पुरंदर मधील भैरवखिंडीकडे चालू लागल्यावर डावीकडे आपल्याला भक्कम बांधणीचा तलाव लागतो. याचे नाव राजाळे तळे असून हा तलाव व पद्मावती तलाव हे शिवाजीराजांनी बांधलेले आहेत. किल्ला लढविताना दारूगोळ्यांबरोबरच गडावर पाण्याचा साठा मुबलक असावा लागतो. म्ह़णूनच या मोठ्या तलावांची निर्मिती महाराजांनी त्या काळी केली होती. भैरवखिंडीमध्ये शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण डावीकडील बराकीकडे चालू लागतो. शेवटच्या बराकीच्या मागून वज्रगडाकडे जाणारी पायवाट आहे. सोप्या चढणीच्या मार्गाने आपण वज्रगजडाच्या दरवाजामध्ये पोहोचतो. हा दरवाजा भक्कम बांधणीचा असून उत्तराभिमुख आहे.


वज्रगडावर पोहोचून आपण भैरवखिंडीच्या वरच्या कड्यावर आल्यावर येथून पुरंदर किल्ल्याचे लक्षवेधक दृष्य येथून दिसते. याच भागातून दिलेरखानाने पुरंदरवर तोफा डागल्या होत्या. वज्रगडावर पाण्याची टाकी, घरांचे अवशेष, ढासळत चाललेली तटबंदी, तसेच पूर्व टोकावरील महादेवाचे मंदिर असे सर्व पहाण्यासाठी अर्धा तास पुरतो. हे पाहून आपण पंधरा मिनिटांमध्ये पुन्हा भैरवखिंडीमध्ये येतो.


भैरवखिंडीतून माचीकडे निघाल्यावर डावीकडील वाट पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे खाली पुरंदरेश्वर दिसतो. ही वाट कड्याला भिडल्यावर कड्यामध्ये लक्ष्मीची देवळी आहे. याच्या थोडे वर उत्तराभिमुख असलेला दिल्ली दरवाजा किंग सर दरवाजा म्हणून ओळखला जाणारा दरवाजा आहे. या दरवाजा समोरही तटबंदी असल्यामुळे खालून तटबंदीवर तोफांचा मारा होणे अशक्य आहे.


दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍याच्या जागा आहेत. येथून वर आल्यावर डावीकडे कंदकड्याकडे वाट जाते. हा भाग तटबंदीने युक्त असा आहे. उजवीकडे देखणा असा ढाल दरवाजा दिसतो. याचा एक बुरूज भला थोरला असून दुसरा त्या मानाने खूप लहान आहे. त्यामुळे प्रवेशदाराजवळ शत्रू आल्यास मोठया बुरूजावरुन त्यावर हल्ला करता येतो. या मार्गाशिवाय येथून पुढे जाताच येत नाही. या दरवाजातून आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. आत घरांचे अवशेष आपल्याला दिसतात. समोर दोन उंच टेकड्या दृष्टीस पडतात. यातील पहिली म्हणजे राजगादी आणि दुसरी केदार टेकडी.


राजगादीच्या खालच्या बाजूला भक्कम तटबंदी आहे. त्यामुळे येथून वर येणे अशक्यप्राय आहे. या तटबंदीला अनेक बुरुज आहेत. यातच प्रसिध्द असा शेंदर्‍या बुरूज आहे. राजगादीच्या माथ्यावर राजवाडा होता. त्याचे काहीही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत. येथेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. राजगादीच्या डावीकडून जाणार्‍या पायवाटेने आपण केदार टेकडीकडे चालू लागतो तेव्हा डावीकडील कड्याच्या पोटात ठराविक अंतरांवर असलेली अनेक पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात. या टाक्या जवळून खाली केदार दरवाजाकडे जाणारी वाट आहे. ही वाट तशीच पुढे फत्ते बुरुजाकडून कोकण्या बुरूजाकडे जाते.


राजगादीच्या डावीकडील वाटेने राजगादी ओलांडून पुढे आल्यावर समोर केदार टेकडीवर जाणार्‍या रेखीव बांधणीच्या पायर्‍यांची वाट आहे. टेकडीच्या माथ्यावरील केदारेश्वराचे मंदिर आपल्या नजरेला स्पष्ट दिसून लागते. या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला भक्कम अशा भींती बांधून ही वाट अतिशय सुरक्षित केलेली आहे. पायर्‍या चढून आपण पुरंदरच्या सर्वेच्च माथ्यावर पोहोचतो. येथे वाहणार्‍या भन्नाट वार्‍याने भर उन्हातही थकवा जाणवत नाही. केदारेश्वराच्या दारात नंदी मंडप आहे. तसेच येथे दीपमाळ आहे. केदारेश्वराचे दर्शन घेऊन आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो तेव्हा आजूबाजूचा विशाल प्रदेश आपल्या दृष्टीला मोहवून टाकतो. येथून आपण चौफेर दृष्टी फिरवल्यास कानिफनाथ, दिवे घाटाचा माथा, सोनोरीचा किल्ला, ढवळेश्वर, भुलेश्वर, जेजूरी, कर्‍हे पठार, समोरच असलेला वज्रगड, वीरचा जलाशय, शिरवळचा परिसर, खंबाटकी घाट, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वराचे पठार, विचित्रगड ऊर्फ रोहिडा, राजगड, तोरणा, सिंहगड, गोकूळ, वृंदावन तसेच लक्ष्मी ही भुलेश्वर रांगेतील शिखरे तसेच शेजारील सूर्य व चंद्र शिखरे प्रेक्षणीय वाटतात.


सह्याद्रीचे मनमोहक रुप आपल्या नजरेत घेऊन आणि मनात साठवून आपण पायर्‍या उतरायला लागतो. येथून आल्या वाटेने परत जाता येते अथवा केदार दरवाजाने उतरून भैरवखिंडीतूनही पुरंदर माचीमध्ये येता येते. माचीमध्ये आल्यावर पुन्हा एकदा आपल्याला वीर मुरारबाजींचे दर्शन घडते. तेव्हा या नरवीरासमोर आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या निष्ठेला, स्वामीकार्याला एक मानाचा मुजरा करुन आपला आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान घेऊनच बिनी दरवाजातून परतीच्या मार्गावर निघतो.


पुरंदर उंची - १३९० मीटर ( समुद्रसपाटीपासून)
पुणे-सासवड-पुरंदर - ५० किलोमीटर
पुणे- कापूरहोळ -पुरंदर - ५५ किलोमीटर
सातारा-कापूरहोळ-पुरंदर - ९५ किलोमीटर


गडावर जेवणाची व राहण्याची सोय नाही. योग्य सोय पायथ्याच्या नारायणपूर येथे अथवा सासवड येथे होऊ शकते.

No comments:

Post a Comment